शेतकामाची
अवजारे व यंत्रे : शेतीची
कामे, तिचे संधारण आणि
सर्वसाधारण सेवा यांसाठी वापरण्यात येणारी अवजारे व यांत्रिक साधनसामग्री यांमुळे
शेतीचे उत्पन्न वाढविण्यास मदत होते. मानवी श्रम वाचविण्यासाठी प्राचीन काळात
लावण्यात आलेल्या शोधांची संख्या थोडीच होती. नाईल व पो नदयांच्या खोऱ्यांसारख्या
समृद्ध क्षेत्रांतच शेतीचा उत्कर्ष झालेला आढळतो. कारण तेथेच सधन शेती होत असे.
शेतीमधील यांत्रिक युगाची उत्कांती ही उदयोगातील व
वाहतुकीतील उत्कांतीच्या बरोबर झाली. मात्र विसाव्या शतकापर्यंत हाताने
वापरावयाच्या अवजारांऐवजी यंत्रांचा वापर व्यापक प्रमाणात झाला नव्हता. अजूनही
जगातील मोठया भागात हातात कुदळ घेतलेला माणूस हा शेतजमीन कसणाऱ्या माणसाचे प्रतीक
म्हणून राहिला आहे.
नांगरामधील
सुधारणा १६०० सालापर्यंत अगदी मंद गतीने होत होती. त्या काळात काही ब्रिटिश
जमिनदारांनी नांगरात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली होती. जेथ्रो
टल (१६७४-१७४१) यांनी १७३३ च्या सुमारास इंग्लंडमध्ये शेतीच्या मशागतीचा प्रचार
केला. अठराव्या शतकात यानंतर टॉमस जेफर्सन यांनी अगदी चांगल्या नांगरटीचा पुरस्कार
केला. १८१४ सालामध्ये जेथ्रो वुड (१७७४-१८३४) यांनी एका नांगराचे एकस्व (पेटंट)
घेतले.
सुमारे १८३३ साली जॉन लेन (न्यूयॉर्क राज्य), जॉन डिअर (१८०४-८६ इलिनॉय) व जेम्स ऑलिव्हर
(१८२३-१९०८ इंडियाना) यांनी ओतीव घडीव पत्र्यापासून कार्यक्षम पोलादी नांगर तयार
केला. हा जमीन भुसभुशीत करणारा नांगर १८७० सालापर्यंत प्रमाणभूत झाला. दाट
झाडीखाली फिरण्यासाठी लागणाऱ्या लोळण फणासारख्या जोडण्या कधीकधी नांगराला
अमेरिका हा देश १८०० सालानंतर शेतकामाच्या यंत्रांचा विकास
करणारा आघाडीवरील देश झाला. तेथे इंग्लंड व यूरोप खंडातील इतर देशांमधून आलेल्या
कल्पनांमध्ये अमेरिकेतील संशोधकांनी सुधारणा करून हे साध्य केले होते.
विकसनशील देशांतील शेतीत काही तुरळक क्षेत्रात यांत्रिकीकरण
झालेले आहे. भारत व मध्यपूर्वेतील देश, आफिका आणि लॅटिन अमेरिका या ठिकाणी शेतकामाकरिता लहान व मोठी यंत्रे आणि
ट्रॅक्टर यांचा संमिश्र वापर करण्यात येतो. भारतात लहान आकाराची शेती, जलसिंचित जमिनीचे एकंदर लागवडीखाली असलेल्या क्षेत्राशी अल्प प्रमाण
यांमुळे यंत्रसज्ज शेतीचे प्रमाण अल्पच आहे.
भारत
: भारतीय शेती
पद्धतीची परंपरा फार पुरातन आहे. प्राचीन काळापासूनच निरनिराळ्या शेती पद्धतींचा
अवलंब केला जात आहे. हवामान, जमिनीचा प्रकार इ. गोष्टी
लक्षात घेता भारतीय शेती नैसर्गिक रीत्या विविध भागांत विभागली गेली आहे. या
कारणामुळेच प्रत्येक विभागातील शेती अवजारांची बनावट आवश्यकतेनुसार निरनिराळी आहे.
ढोबळपणे नांगर, मैंद, कुळव, केणी, पाभर, कोळपी यांसारखी
अवजारे आणि विळा, कोयता, खुरपे,
कुदळ, टिकाव इत्यादींसारखी साधने
मुख्यत्वेकरून शेतकामासाठी वापरण्यात येतात.
पुरातन
काळापासून पारंपरिक पद्धतीने शेतकामासाठी वापरण्यात येणारी अवजारे आणि साधने काही
जड तर काही हलकी असतात. माणसांकडून आणि जनावरांकडून या अवजाराद्वारे शेतीची
वेगवेगळी कामे करून घेतली जातात. आजही त्यामध्ये विशेष असा बदल झालेला आढळत नाही.
पूर्वीप्रमाणेच ती अवजारे बाभूळ, खैर,
सागवान इ. स्थानिक उपलब्ध लाकडापासून बनविली जातात. खेड्यातील सुतार
व लोहार यांसारखे कारागीर त्यांची जडणघडण व दुरुस्ती करतात. आजच्या आधुनिक युगात
या पारंपरिक अवजारांमध्ये काही सुधारणा घडवून आणून ती शेतीला अधिकाधिक उपयुक्त कशी
बनविता येतील याबाबत तंत्रज्ञांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.
भारतात शेती अवजारे ओढण्यासाठी मुख्यतः
वापरल्या जाणाऱ्या बैलांच्या जाती, त्यांची सरासरी वजने यांची माहिती तसेच निरनिराळी अवजारे ओढण्यास लागणारी
सरासरी ओढ याबद्दलची माहिती पुढे दिलेली आहे.
नांगर, कुळव, पाभर, कोळपे, मळणीची साधने इ. देशी अवजारांत विशिष्ट
प्रदेशातील पर्जन्यमान, जमिनीचा प्रकार, पिकाचा प्रकार, पीक पद्धती, उपलब्ध
जनावरांची परिस्थिती इत्यादींप्रमाणे पुष्कळशी तफावत आढळते. विभागवार अवजारांची
नावेसुद्धा वेगवेगळी आढळतात. या बाबी लक्षात घेऊन अवजारांसंबंधी सविस्तर विवेचन
करण्यात आले आहे. यामध्ये अवजारांची वर्गवारी मशागतीच्या प्रकारानुसार करणे सोयीचे
असल्याने तशी वर्गवारी करणे योग्य ठरते.
पेरणीपूर्व मशागतीची अवजारे : पेरणीपूर्व मशागतीमध्ये शेतीची नांगरणी
करणे हे फार महत्त्वाचे काम आहे. याकरिता पूर्वापारपासून देशी किंवा लाकडी
नांगरांचा वापर केला जातो. विभागानुसार वेगवेगळे नांगर वापरले जात असल्याने
त्यांना नावेही तशीच आहेत. जमिनीच्या प्रकारानुसार नांगरांच्या आकारात आणि वजनात
खूपच तफावत आढळून येते. त्यातील काही महत्त्वाचे नांगर म्हणजे सोलापूर नांगर,
पुणेरी नांगर, भातशेतीमधील नांगर, चरोचर नांगर, पंचमहाल नांगर, धारवाडी
हलका नांगर हे होत. हे सर्व नांगर सर्वसाधारणपणे ‘ देशी नांगर ’ या सदराखाली
येतात. या देशी नांगरांचा फार पूर्वीपासून बैलांच्या साहाय्याने वापर करण्याची
पद्धत आहे परंतु या नांगरांच्या वापराने होणारी कामाची प्रत खूपच हलक्या दर्जाची
असते आणि लागणारा वेळही खूपच जास्त असतो. शेतीतील बदलती आव्हाने लक्षात घेऊन आणि
काळाची गरज विचारात घेऊन नांगरामध्ये खूप सुधारणा घडून आल्या आणि चांगल्या प्रतीची
मशागत करणारे अनेक सुधारित नांगर अस्तित्वात आले. सुधारलेले नांगर हे मुख्यत्वे
लोखंडी (वा पोलादी) नांगर आहेत. सुधारित नांगरांचे बैलांच्या साहाय्याने चालविले
जाणारे आणि कर्षित्राने (ट्रॅक्टरने) चालविले जाणारे असे प्रमुख दोन प्रकार आहेत.
फाळाचा
नांगर : फाळाच्या
नांगरामध्ये एकतर्फी आणि दुतर्फी असे दोन प्रकार आहेत. बैलांच्या साहाय्याने
चालणाऱ्या फाळाच्या नांगराला एकच फाळ असतो.
सरीचा
नांगर : पेरणीपूर्व मशागत
केल्यानंतर ऊस, बटाटा किंवा तत्सम पिकाची लागवड करण्यासाठी
जमिनीत सऱ्या तयार करण्याकरिता सरीच्या नांगराचा वापर केला जातो. या नांगराला
असलेले दोन पंखे आत-बाहेर सरकवून सरीची रुंदी कमी-जास्त करता येते.
तव्यांचा
नांगर : जमिनीच्या
बाजूकडील ओढ व घर्षण कमी करण्यासाठी तव्यांच्या नांगराचा शोध व विकास करण्यात आला.
हा नांगर ओढण्यासाठी फाळाच्या नांगरापेक्षा कमी शक्ती लागते. शिवाय कठीण व
दगडगोट्यांचा जमिनी नांगरण्यासाठी तव्यांच्या नांगराचा उपयोग फायदेशीर ठरतो.
तळजमीन
फोडण्याचा नांगर : सर्वसामान्यपणे
जमिनीची मशागत एका ठराविक खोलीपर्यंतच होते. शिवाय वनस्पतींची मुळेसुद्धा ठराविक
खोलीपर्यंतच जातात. जमीन नांगरणे हा या नांगराचा उद्देश नसून कठीण तळजमीन फोडणे हा
प्रमुख उद्देश आहे.
फिरता
नांगर : हा नांगर
अलीकडच्या काळात प्रचलित झाला आहे. यामध्ये दर मिनिटाला ३०० फेरे घेणाऱ्या आसावर
धारदार पाती बसविलेली असतात. पात्यांचा आकार कुदळीसारखा किंवा इंग्रजी ‘ एल् ’
अक्षरासारखा असतो.
कुळव : शेतजमीन नांगरल्यानंतर निघालेली ढेकळे फोडून तणकटे मोकळी करणे, जेणेकरून ती वेचून जमीन स्वच्छ करता येईल आणि माती भुसभुशीत करणे यांसाठी
कुळवाचा वापर केला जातो. पेरणीपूर्वी कुळवाची पाळी दिल्याने मातीत खत योग्य
प्रकारे मिसळले जाते.
कुळवांचे
मुख्य तीन प्रकार आहेत : (१) फासेचा कुळव, (२) तव्यांचा कुळव आणि (३) ड्रॅग प्रकारचा कुळव.
भागांनुसार
देशी कुळवांना वेगवेगळी नावे आहेत. ती अशी : (१) वखर, (२) पुणेरी कुळव, (३)
कोंग्या कुळव, (४) भडोच कुळव, (५)
अहमदनगर कुळव, (६) भाल कुळव, (७)
बेळगाव कुळव, (८) मैंद, (९) डोणी,
(१०) फळी, (११) दुहेरी फळी, (१२) मोगरी (हात कुळव).
आधुनिक
शेतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बरेच सुधारित कुळव वापरात आहेत. सुधारित कुळवांचा
वापर केल्याने मिळणारी कामाची प्रतही चांगल्या प्रकारची असते. तव्यांच्या कुळवाचा
वापर त्यातल्या त्यात मोठया प्रमाणात होतो.
तव्यांचा
कुळव: तव्यांचा कुळव कर्षित्रचलित किंवा बैलचलित प्रकारचा असतो. बैलचलित
तव्यांच्या कुळवाला तव्यांच्या एक किंवा दोन ओळी (गँग) असतात.
ड्रॅग
प्रकारचा कुळव :
या प्रकारात मोडणारे कुळव म्हणजे (१) सुऱ्यांचा कुळव,
(२) नॉर्वेजियन कुळव, (३) खुंटी कुळव,
(४) स्प्रिं ग कुळव, (५) ॲक्मे कुळव हे होत.
कल्टिव्हेटर
: पेरणीपूर्व
मशागतीसाठी शेताची नांगरणी केल्यानंतर कुळवाप्रमाणेच कल्टिव्हेटरचा वापर करणे
पेरणीसाठी जमीन तयार करण्याच्या कामी उपयुक्त ठरते.
जमीन
सपाट करण्याची अवजारे : पेरणीपूर्वी काही प्रमाणात जमिनीचे सपाटीकरण ही आवश्यक बाब असते.
उंचवट्याच्या भागाकडील माती अवजाराच्या साहाय्याने अथवा मजुराकडून सखल भागात
पसरल्याने जमीन सपाट होते
गुटे
फळी : साधारणपणे १०० ते
१२० सेंमी. लांबीची आणि २५ ते ३० सेंमी. रूंदीची फळी घेऊन तिला एक रूमणे बसविलेले
असते. गुटे फळीला दोन लोखंडी गोल कड्या बसवून त्यांच्या साहाय्याने बैल जोडून माती
ओढण्याचे काम करतात. फळीची खालची बाजू थोडीशी धारदार केलेली असल्याने फळीत माती गोळा
होणे सोपे जाते. गुटे फळीत भरलेली माती बैलाच्या साहाय्याने इच्छित ठिकाणी पसरून
जमिनीचे सपाटीकरण करतात.
केणी पेटारी : लहान वरंबे घालण्यास किंवा शेतातील खोलगट भाग भरून जमीन सपाट करण्यास केणी
किंवा लोखंडी पेटाऱ्याचा चांगला उपयोग होतो पेटारीत माती भरली जाते आणि ती खोलगट
भागात सोडून जमिनीचे सपाटीकरण करतात. मोठमोठे बांध किंवा ताली घालण्याचे कामसुद्धा
पेटारीच्या साहाय्याने चांगले होते.
स्वयंचलित
बलिवर्दधरा यंत्र : मोठमोठे उंचवटे
सपाट करणे, मुरमाच्या कठीण जमिनीचे सपाटीकरण करणे, पाझर तलाव किंवा धरणाचे मोठमोठे बांध घालणे इ. कामांसाठी स्वयंचलित
बलिवर्दधरा यंत्राचा वापर केला जातो.
बंड फॉर्मर : वेगवेगळ्या अवजारांचा वापर करून भुसभुशीत झालेल्या जमिनीत लहान लहान
आकाराचे बांध तयार करण्यासाठी बंड फॉर्मर
पेरणीची
अवजारे व यंत्रे : जमिनीच्या
मगदुराप्रमाणे व हंगामानुसार पेरणीसाठी निरनिराळ्या अवजारांचा उपयोग केला जातो.
पूर्वीपासून कुळव, देशी नांगर अथवा अरगडा यांच्या जानोळ्याला
मागे पोकळ बांबूचे ‘ सरते ’ बांधून त्यातून बी पेरले जाते. पोकळ बांबूचे एक टोक
फोडून चाड्याच्या आकाराचे करतात जेणेकरून बी पेरणाऱ्याच्या हाताची मूठ त्यावर
व्यवस्थित बसेल. सरत्याची उंची साधारण पेरणाऱ्याच्या खांद्यापेक्षा कमी ठेवली
जाते. एकावेळी पिकाची एकच ओळ पेरावयाची असेल तेव्हा ‘ मोघण ’ हे अवजार वापरतात.
यासाठी मनुष्य बळाचा वापरही केला जातो.
पेरणीसाठी अवजार तयार करताना, त्याच्या फणाइतक्या नळ्या चाड्याला जोडून घेतात. चाडे मजबूत दोरीने
अवजाराच्या दांडीला आणि दिंडाला धरून एक विशिष्ट गाठ देऊन घट्ट आवळून बांधतात. या
गाठीला चाडेगाठ असे नाव आहे. अवजार पेरणीसाठी चालू असताना पेरणारा मनुष्य बी
मुठीने चाड्यांतील माशीवर सोडतो. ते चाड्याच्या वाटीत सर्वत्र पसरून भोकावाटे
त्यांना जोडलेल्या नळ्यांमधून फणाला असलेल्या भोकांमधून मातीत, फणामुळे तयार झालेल्या तासात पडते. एक दिवसाकाठी साधारण एक हेक्टर
क्षेत्रावर पेरणी होऊ शकते.
सुधारित
पेरणीची अवजारे : बैलचलित देशी तिफण
किंवा चौफण वापरताना पेरणीची खोली आणि दोन रोपांमधील अंतर नियंत्रित करण्याची
कोणतीही सोय नसल्याने होणाऱ्या कामाची प्रत ही पूर्णपणे बैल हाकणाऱ्या व पेरणी
करणाऱ्या मजुराच्या कौशल्यावर अवलंबून असते. सुधारित पेरणी यंत्रामध्ये या
अडचणींवर मात करण्यात आलेली आहे.
पुणेरी पेरणी यंत्र : हे सुधारित पेरणी यंत्र आहे. या
यंत्राच्या साहाय्याने बी पाहिजे त्या प्रमाणात नियंत्रित खोलीवर आणि दोन
ओळींमध्ये योग्य अंतर ठेवून पेरता येते. बियांसाठी बसविलेल्या पेटीच्या खालच्या
बाजूला बी नियंत्रित करण्यासाठी फिरक्या बसविलेल्या असतात. त्यातून बी प्लॅस्टिकच्या
नळीमधून उतरून योग्य त्या खोलीवर पडते.
सुधारित
खत व बी पेरणी यंत्र : सुधारित पुणेरी पेरणी यंत्रामध्ये आणखी सुधारणा करून बिया बरोबरच रासायनिक
खत पेरून देण्याची व्यवस्था केलेली आहे. रासायनिक खते ठेवण्यासाठी वेगळी पेटी
पेरणी यंत्रावर बसवून त्याच्याखाली खत नळ्यांत सोडण्यासाठी भोके असलेल्या गोल
चकत्या बसविलेल्या असतात.
बैलचलित
टोकण यंत्र : उत्पादन वाढीचे
लक्ष्य गाठताना पिकाची पेरणी योग्य प्रकारे करणे हे सर्वांत महत्त्वाचे काम आहे.
आंतरमशागतीची
अवजारे : उगवून आलेल्या
पिकांत जी मशागत केली जाते तिलाच आंतरमशागत असे म्हणतात. पीक उगवून आल्यानंतर
त्याची योग्य प्रकारे जोमदार व निरोगी वाढ होण्यासाठी आंतरमशागतीची आवश्यकता असते.
आंतरमशागतीमुळे पिकांतील तणांचे नियंत्रण करून मुख्य पिकासाठी अन्नद्रव्याचा
पुरवठा योग्य प्रकारे केला जातो. तसेचत्यामुळे जमिनीत हवा खेळती राहून
अन्नद्रव्यांची उपलब्धताही वाढविली जाते.
आंतरमशागत
करण्यासाठी पारंपरिक पद्धतीत खुरपे किंवा विळा या हात अवजारांचा वापर सर्वमान्य
आहे. पिकाच्या दोन ओळींत खुरपे किंवा विळ्याचा हाताने वापर करतात. अर्थात या
पद्धतीत कामाचा उरक फारच कमी असतो. आंतरमशागतीचा वेग कोळप्यांचा वापर करून मोठया
प्रमाणात वाढविता येतो. कोळपी वापरण्यासाठी सामान्यतः बैलांचा वापर केलेला जातो.
आंतरमशागतीसाठी वापरण्यात येणाऱ्या कोळप्यामध्ये डवरा, डवरी, धुंडिया
यांसारखी अखंड फासेची कोळपी वापरण्यात येतात. एका बैलजोडीच्या साहाय्याने दोन ते
तीन कोळपी एका वेळेस चालविता येतात. कोळप्याचे अनेक प्रकार गामीण भागांत प्रचलित
आहेत. त्यांत (१) अखंड फासेचे कोळपे, (२) फटीचे कोळपे,
(३) अकोला कोळपे, (४) बडोदा कोळपे इ. प्रकार
वापरात आहेत. पिकाला भर देण्याचे महत्त्वाचे काम करणे कोळप्याच्या वापरामुळे शक्य
होते.
अखंड
फासेचे कोळपे : याची रचना बरीचशी
कुळवाप्रमाणे असते परंतु आकार लहान व वजन कमी असते.
फटीचे
कोळपे : फटीच्या
कोळप्याची रचना वरीलप्रमाणेच असते, परंतु फास अखंड न वापरता दिंडाच्या दोन्ही टोकाला इंग्रजी ‘ एल् ’ आकाराची
फास बसविलेली असते.
अकोला कोळपे : लाकडी दिंडांत किंवा लोखंडी पट्ट्याच्या दिंडांत खालच्या टोकाला त्रिकोणी
आकार दिलेले दोन फण या अवजारांत बसविलेले असतात. त्यांच्यामध्ये परंतु दिंडापासून
पुढे थोड्या अंतरावर दांडीवर आणखी एक त्याच प्रकारचा फण बसविलेला असतो. अशा
प्रकारे अकोला कोळप्याला तीन फण बसवून कोळपणीचे काम केले जाते.
पीक
संरक्षणाची यंत्रे : उभ्या पिकात
करावयाच्या आंतर-मशागतीव्यतिरिक्त महत्त्वाची कामे म्हणजे पीक संरक्षणाची. तणाच्या,
रोगांच्या आणि किडीच्या नियंत्रणासाठी पिकात तणनाशकाची, कीड-नाशकाची व रोगनाशकांची फवारणी अथवा धुरळणी करण्याची गरज असते. यासाठी
वापरली जाणारी वेगवेगळी देशी आणि सुधारित फवारणी व धुरळणी यंत्रे वापरली जातात.
या काळात लहान कर्षित्रावर चालणारी फवारणी यंत्रे अस्तित्वात
आलेली आहेत. पीक संरक्षणासाठी औषधी भुकटीची धुरळणी करण्यासाठी मानवचलित अथवा
एंजिनचलित धुराळी यंत्रांचा वापर केला जातो.
पीक
काढणी व कापणी यांसाठी यंत्रे व अवजारे : पीक तयार झाल्यानंतर ते काढण्यासाठी वापरली जाणारी अवजारे पीक काढण्याच्या
पद्धतीनुसार वेगवेगळी असतात. फळे, फुले, भाजीपाला इ. पिके हाताने तोडून काढली जातात. जमिनीत वाढणारी पिके उदा.,
बटाटा, रताळी, हळद,
आले, सुरण वगैरे जमिनीतून खणून काढावी लागतात.
गहू आणि भात या पिकांची कापणी करण्यासाठी स्वयंचलित कापणी
यंत्र विकसित करण्यात आले आहे. कापणी यंत्राच्या साहाय्याने वेळेची आणि मजुरीची
फारच मोठया प्रमाणात बचत होते.
पाश्चात्त्य
देशांत गव्हाचे पीक कापून लगेच मळणी करून धान्य पोत्यात भरून देणारी संयुक्त
संयंत्रे वापरली जातात. भारतातही या संयुक्त संयंत्राचा वापर आता मोठया प्रमाणात
होऊ लागला आहे.
पीक
मळणीची अवजारे व यंत्रे : ज्वारी, बाजरीच्या कणसापासून दाणे वेगळे करणे,
ओंब्यापासून गहू अथवा भाताचे दाणे वेगळे करणे या कामाला मळणी असे
सामान्यतः संबोधले जाते. पूर्वापारपासून मळणी करण्यासाठी वेगवेगळ्या देशी
तंत्रांचा वापर केला जातो. मळणी करावयाचे पीक थोडेच असेल तर काठीने अथवा मोगरीने
बडवून मळणी केली जाते. मळणीचे काम मोठया प्रमाणात असेल तर शेतकरी खळ्याचा वापर
करतात.
पिकांच्या मळणीसाठी आता अनेक सुधारलेली मळणी यंत्रे वापरात
आली आहेत. गव्हाच्या मळणीसाठी ‘ ओलपाड गहू मळणी यंत्राचा ’ वापर केला जातो.
ज्वारी, बाजरी,
गहू , हरभरा व इतर कडधान्ये वगैरेंच्या
मळणीसाठी आता एकाच मळणी-उफणणी यंत्राचा वापर सर्रास होऊ लागला आहे.
शेतमाल
वाळविण्याची साधने : मळणी केल्यानंतर
तयार झालेले धान्य साठवून ठेवण्यापूर्वी वाळविणे अत्यंत महत्त्वाचे आहे
शेतमाल
प्रतवारी लावण्याची साधने : शेतमाल बाजारात पाठविल्यानंतर त्याला योग्य भाव मिळण्यासाठी तो स्वच्छ
करून त्याची प्रतवारी करणे महत्त्वाचे आहे. फळे, भाजीपाला,
अंडी इ. प्रकारच्या मालाची प्रतवारी भारतात बहुतांशी हातानेच केली
जाते. यासाठी बांबूच्या पातळ पट्ट्यांपासून तयार केलेल्या सुपाचा वापरसुद्धा
करतात.
शेतमाल
प्रकिया : शेतमालाची
बाजारातील किंमत वाढविण्यासाठी तसेच तो बराच काळपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी त्यावर
प्रकिया करणे फायद्याचे ठरते. या प्रकिया शेतमालानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या
असतात.
फळे
व भाजीपाला दीर्घकाळपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी त्यावर प्रकिया करून ते हवाबंद
डब्यात भरून ठेवता येतात. यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रकिया मोठया आहेत. हवाबंद
डब्यांतून प्रकिया केलेली फळे व भाजीपाला कितीही अंतरावरच्या बाजारपेठेत उपलब्ध
करून देता येतात.
पाणी
उपसण्याची साधने : पाणी उपसून शेतातील
पिकाला पुरविण्यासाठी अनेक प्रकारची देशी व सुधारित साधने वापरली जातात. देशी
साधनांचा वापर दिवसेंदिवस कमी होत गेला आहे आणि सुधारित साधनांचा या कामी वापर
वाढलेला आहे.
सुधारित
साधने : (१) लोखंडी पोहृयाच्या माळेसह लोखंडी रहाट-गाडगे, (२) पाणदट्ट्या, (३)
पवनचक्की, (४) पुढे-मागे गतीचे पंप, (५)
अपमध्य पंप.
शेतमालाची
वाहतूक : शेतमालाची वाहतूक
हा शेतकामातील महत्त्वाचा भाग आहे. यासाठी अनेक प्रकारची देशी आणि सुधारित साधने
वापरली जातात.
देशी
साधने : (१) बैलगाडी, (२) लाकडी अथवा लोखंडी
बंडी, (३) छकडा, (४) दमणी, (५) दुचाकी सायकल.
सुधारित
साधने : (१) रबरी चाकाची सुधारित बैलगाडी, (२) मालमोटार, (३) कर्षित्र आणि ट्रोली, (४) पिकअप व्हॅन.
दूधदुभत्याच्या
धंद्यासाठी लागणारी साधने : देशी साधने : (१) दूध काढण्याची चरवी, (२) तांब्या
भांडे, (३) गंज, (४) डेरा, (५) रवी, (६) दूध विरजविण्यासाठी मातीचे भांडे.
सुधारित
साधने : (१) दूध काढण्यासाठी स्टेनलेस स्टीलचे भांडे, (२) धार काढण्याचे यंत्र, (३) दुधातून मलई काढण्याचे यंत्र, (४) मलईमधून लोणी
काढण्याचे यंत्र, (५) लोणी तयार करण्याचे यंत्र, (६) तूप आचवून ठेवण्याचे पात्र.
शेतकामासाठी
वापरण्यात येणारी इतर साधने : (१) पहार, (२) बादली, (३) झारी,
(४) कुदळ, (५) टिकाव, (६)
फावडे (खोरे), (७) लोखंडी पाटी (घमेले), (८) बुरूडी पाटी (टोपली), (९) कोयता, (१०) विळा/खुरपी, (११) जोखड (जू), (१२) शिळवट (दुहेरी जू), (१३) खिळा-लाकडी, लोखंडी, (१४) जुपण्या, (१५)
दावे, कासरा, दोर.
पाहा
: कृषि; कृषि अभियांत्रिकी;
कृषि संशोधन; ट्रॅक्टर; नांगर;
बैलगाडी; शेतीची कामे.
संदर्भ : 1. Culpin, C. Farm Machinery, 1992.
2. Hunt, D. Farm Power and Machinery Management, 1983.
3. I. C. A. R. Indigenous Agricultural Implements of India, New
Delhi, 1962.
4. McColly, H. T. Martin, J. W. An Introduction to Agricultural Engineering, New York,
1955.
5. Michael, A. M. Oza, T. P. Principles of Agricultural Engineering, Vol. I,
New Delhi, 1999.
6. Sahai, K. B. Elements of Agricul tural Engineering, New Delhi, 2005.
7. Stone, A. A. Gulvin, H. E. Machines for Power Farming, 1977.
८.
आरकेरी, एच्. आर्. (अनु.) पाटील,
ह. चिं. शेतीची साधी यंत्रसामुगी,
मुंबई.

Comments
Post a Comment